Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

गुरुवार, १० मे, २०१२

रयत शिक्षण संस्था



रयत शिक्षण संस्था


भाऊराव पाटील

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील
जन्म सप्टेंबर २२, इ.स. १८८७
कुंभोज, महाराष्ट्र
मृत्यू मे ९, इ.स. १९५९
पेशा शिक्षणप्रसार

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (सप्टेंबर २२, इ.स. १८८७; कुंभोज, महाराष्ट्र - मे ९, इ.स. १९५९) हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.. ते जोतिबा फुलेयांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.

“ एक महान कर्मयोगी भाऊराव पाटील ”

मुलांनो, तुम्ही ज्या विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहात ते विद्यालय रयत शिक्षण संस्थेने सुरू केले आहे. रयत शिक्षण संस्था ही अशिया खंडातील एक सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात मिळून ६७५ शाखा आहेत. त्यामध्ये २० पूर्व प्राथमिक, २७ प्राथमिक, ४३८ माध्यमिक, ८ आश्रमशाळा, ८ अध्यापक विद्यालये, २ आय. टी. आय. व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे. यासंस्थेत सुमारे १७ हजार सेवक काम करतात व ४ लाख ४२ हजार विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेतात. अशा या महान शिक्षण संस्थेची स्थापना थोर शिक्षणमहर्षी पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोंबर, १९१९ रोजी केली.कर्मवीरांना सगळे ती अण्णा या नावाने ओळखतात. आपण अण्णांचा परिचय करून घेऊ या.

कर्मवीरांचे अल्पचरित्र

कर्मवीरांचे पूर्णनाव भाऊराव पायगौंडा पाटील. वडिलांचे नाव पायगौंडा व आईचे नाव गंगाबाई. कर्मवीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील, द्क्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडब्रिदी गावचे. देसाई हे त्यांचे आडनाव. कर्मवीरांचे पूर्वज नशीब आजमवण्यासाठी महाराष्ट्रात आले. व ऐतवडे बुद्रुक जि.सांगली येथे स्थिरावले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली. त्यामुळे त्यांचे देसाई हे आडनाव जाऊन पाटील हे आडनाव रूढ झाले.

कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा प्रसिध्द डोगंर आहे. आज त्या डोगंरावर पार्श्वनाथाचे सुदंर व भव्य स्मारक आहे. या डोगंराच्या कुशीत कुंभोज नावाचे एक छोटे व टुमदार गाव आहे. यागावी २२ सप्टेंबर, १८८७ रोजी ( आश्विन शुद्ध पंचमी, ललीता पंचमी) कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. कुंभोज गावी त्यांचे बालपण गेले. भाऊराव लहानपणी गोंडस, हाडापेराने मजबुत व अवखळ होते. या काळात मनाला येईल तसे हुंदडणे, नदीत डुंबणे, सुरपारंब्या खेळणे यांत त्यांचा वेळ जाई. ते पट्टीचे पोहणारे होते. एकदा पोहताना भली मोठी सुसर आली. मुले घाबरून पळत सुटली. मात्र भाऊराव जागेवर उभे राहिले. शेवटी गोंगाट ऐकून लोक पळत आले. आणि भाऊरावांना ओढून बाहेर काढले. लहानपणापासून भाऊराव बेडर वॄत्तीचे होते. मित्रमंडळींना जमवून ते बाहुबलीच्या डोगंरावर जात. नेतृत्वाचे गुण त्यांच्या अंगात उपजत होते.

कर्मवीरांच्या बालपणी कुंभोज भागात ‘ सत्याप्पाचे बंड ’ हे प्रकरण खूप गाजले. कुंपणाच्या काट्या तोडणा-या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले. सत्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला, रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले व तो फरारी झाला. तो कर्मवीर अण्णांच्या आजोबांच्या ऊसाच्या फडात लपून बसे. छोट्या भाऊरावांना तो अंगाखांद्यावर खेळवी. पराक्रमाच्या गोष्टी सांगत असे. बंडखोरी, सत्यनिष्ठा, अन्यायाविरूध्द चीड हे सदगुण सत्याप्पाकडून भाऊरावांना मिळाले.

भाऊरावांच्या बालपणी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता येत नसे. इतराकडून ते मागून घ्यावे लागे. पाण्यासाठी तासन् तास विनवणी करावे लागे. एकदा ते दृश्य पाहून भाऊरावांचे अंतःकरण कळवळले, त्यांनी दलितांना पाणी देण्याची विनवणी केली. कोणीच ऐकत नाही ते पाहून त्यांनी रहाट मोडून आडात टाकला. ‘ प्या आता पाणी ! ’ असे म्हणून भाऊराव निघून गेले. जातिभेद भाऊरावांना लहानपणापासून मान्य नव्हता. माणूस ही एकच जात व मानवता हाच एक धर्म असे ते म्हणत.

नोकरीमुळे भाऊरावांच्या वडिलांचा संबंध खालच्या थरातील लोकांशी येत असे, त्यांच्या मुलांशी भाऊराव १२-१३ वर्षाचे असताना कुंभोजला आजोळी गेले होते. त्यांच्या अंगात नवा कोट होता. आजोबांच्या घरी सिदू नावाचा सनदी महार आला. त्याच्या अंगावर चिंध्या झालेला. अंगरखा होता. हे पाहून भाऊरावांचे हृदय हेलावले. त्यांनीए अंगावरचा नवा कोट सिदू महारास देऊन टाकला. त्यागाचे बीज लहान वयातच भाऊरावांमध्ये जोपासले होते.

शिक्षण

कर्मवीराचे प्राथमिक शिक्षण दहिवडी, विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले. विट या ठिकाणी दत्तोपंत जोशी यांनी चालविलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रजीचे शिक्षण झाले. तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणास त्यांना जावे लागले.

कर्मवीर अण्णा कोल्हापूरला शिक्षणासाठी गेले तेव्हा कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू महाराज होते. भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता. त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला. सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. सर्व जातींच्या मुलांकरिता मोफत वसतीगॄह सुरू केली. दलितांना शिक्षणात व नोकरीत सवलती दिल्या. अस्पृश्यता निवारण कायदा सुरू केला. बहुजन समाजातील कार्यकर्ते तयार केले. कर्मवीर अण्णा याच तालमीत तयार झाले.

कर्मवीर अण्णांच्या इंग्रजी शिक्षणाची सुरूवात कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झाली. तेथे इंग्रजी तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर हे राजाराम हायस्कूलमध्ये दाखल झाले. कर्मवीरांचा स्वभाव खिलाडू अभ्यासात मागे असले तरी कुस्ती, पोहणे, मल्लखांब अशा क्रीडाप्रकारांत ते पटाईत होते. त्यांच्यामुळे त्यांच्या वर्गाचा खेळात पहिला नंबर यायचा. त्यामुळे ते सर्वांचे लाडके बनले व वर्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले.

कर्मवीर अण्णा कोल्हापूरला शिक्षणासाठी आल्यानंतर दिंगबर जैन बोर्डिंगमध्ये रहात होते. बोर्डिंगमध्ये असताना त्यांनी जुन्या चालीरिती, रूढी यांच्याविरूध्द आवाज उठविला. जेवणानंतर दाढी न करणे, अस्वच्छ पंचे नेसून जेवण करणे य गोष्टीस त्यांनी विरोध केला. त्याबद्दल त्यांना दंड झाला, शिक्षाही सहन केली.

१९०८ साली कर्मवीर अण्णा ‘मिस क्लार्क होस्टेलच्या ’ नामकरणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. अस्पृश्यांसाठी हे वसतिगृह राजर्षी शाहू महाराजानी सुरू केले होते. तेथे सर्व जातीधर्मातील लोक उपस्थित होते.कार्यक्रम संपल्यानंतर कर्मवीर वसतिगृहात आले. वसतिगृह प्रमुखांनी त्यांना आंघोळ करून वसतिगृहात येण्याची ताकीद दिली..अर्थात ते कर्मवीरांनी ते जुमानले नाही. “ मी सकाळी आंघोळ केली आहे. व पुन्हा आंघोळ करणार नाही दलितही माणसे आहेत, घरात कुत्री, मांजरे आलेली चालतात. आणि माणसांचा विटाळ कसा होतो ? आंघोळ केल्यावर विटाळ कसा काय जातो ? ” अशा बे शिस्त वर्तनाबद्दल कर्मवीरांना बोर्डिंगमधून काढून टाकण्यात आले.

त्यानंतर कर्मवीरांना राजवाड्यात राजाश्रय मिळाला. शाहू राजाच्या सहवासात असल्यामुळे राजाच्या कार्याचा, समाजसुधारणेचा ठसा कर्मवीरांवर उमठला.कर्मवीरांनी आपल्या आयुष्यात ग्रामीण शैक्षणिक कार्याचा जो प्रचंड वटवृक्ष उभा केला त्याचे स्फूर्तीस्थान राजर्षी शाहू महाराज आहेत किबंहुना शाहू महाराज हे रयतेच्या राजाने कर्मवीर अण्णांच्या रूपाने महाराष्ट्राला ही अमोल देणगी बहाल केली असे म्हणावे लागले.

कर्मवीर राजवाड्यात राहून्ब शिक्षण घेत होते. एके दिवशी कर्मवीर अण्णा राजवाड्यातील मुलांबरोबर क्रिकेट खेळत होते. कर्मवीरांनी मारलेल्या चेंडूच्या एका टोल्याने राजवाड्याच्या खिडकीची काच फुटली. जेव्हा महाराजांनी चोकशी केली तेव्हा कर्मवीरांनी महाराजांना सत्य सांगितले. महाराजानी कर्मवीराना विचारले. “ अरे, तुला माझी भीती कशी वाटली नाही ” ? त्यावेळी कर्मवीर म्हणाले. “ महाराज, त्यात भिती कसली ? जे घडलं ते खरं सांगायच आणि मिळेल ती शिक्षा घ्यायची ” या बाणेदार उत्तराने महाराज खूष झाले व त्यांनी कर्मवीरांना माफ केले. सत्य तेच बोलणार हा कर्मवीरांचा उपजत स्वभाव होता. कर्मवीरांनी आयुष्याभर सत्याची कास धरली.

एकदा कर्मवीर सुटीत इस्लामपूरला आले. त्यावेळी कर्मवीरांचे आईवडील तेथे रहात होते. रिकाम्या वेळेत कर्मवीर शाळेकडे गेले. पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता. सर्व मुल वर्गात बसलेली होती आणि एक मुलगा वर्गाबाहेर कुडकुडत बसला होता गुरूजीकडे विचारपूस केल्यानंतर तो महाराचा मुलगा असल्याने वर्गाबाहेर बसविल्याचे कर्मवीरांना कळले. ते त्या मुलाला घरी घेऊन आले.घरात स्वतःजवळ बसवून जेऊ घातले. नंतर कोल्हापूरला नेऊन त्याला ‘ मिस क्लार्क होस्टेल ’ ला दाखल केले. त्याचे नाव ज्ञानदेव घोलप. तो पुढे शिकून कर्तबगार झाला. विधिमंडळाचा सभासद झाला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेल्या ‘ मूकनायक ’ या वर्तमानपत्राचा तो काही काळ संपादक होता. कर्मवीरांच्या आईने घरात महाराचा मुलगा आणला म्हणून फुंकणीने मारले ;पण फुंकणीचा मार फुकट गेला नाही. पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला समतेची गोड फळे आली.

कर्मवीर अण्णांचे हायस्कूममध्ये शिक्षण घेत होते; पण शिक्षणा मध्ये अजिबात रस नव्हता. त्यांचा ओढा सामाजिक कार्याकडे होता. त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजी सहावी (आताची दहावी) परीक्षेत त्यांना अपयश आले आणि तेथेच कर्मवीरांनी शिक्षणाला रामराम ठोकला. त्यानंतर ते कोरेगावला वडिलांच्या बदलीच्या गावी आले.

रयत शिक्षण संस्थेची स्थापना

कर्मवीर अण्णांचे लग्न त्यांच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी लक्ष्मीबाई यांच्या बरोबर झाले. त्यावेळी त्यांचे वय १२ वर्षांचे होते. त्यांचे माहेरचे नाव आदाक्का असे होते. त्यांचे माहेर कुंभोज माहेरचे आडनाव पाटील हे एक प्रतिष्ठित व श्रीमंत घराणे होते. लग्नात त्यांनी सौ. लक्ष्मीबाई यांना १२० तोळे सोन्याचे दागिने केले होते. शिक्षण सोडल्यानंतर कर्मवीर अण्णा कोरेगावला आले. त्यावेळी सौ. लक्ष्मीबाई (नंतरच्या काळात सौ. वहिनी म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या) कोरेगावची होत्या. याच काळात कर्मवीरांच्या जीवनाला कलाटणी मिळणारी घटना घडली. घरी पाहुणेमंडळी आली. जेवणाचा बेत होता.पाहुणे मंडळी जेवायला बसली. कर्मवीरांची पत्नी सौ. लक्ष्मीबाई वाढत होत्या. गप्पा सुरू होत्या. एका पाहुण्याने विचारले, “ काही काम करत नाही तो एकच काम करतो. दोनवेळ जेवणाचं व गावभर फिरण्यांच .” आपले चिरंजीव भाऊराव काय काम करतात ? भाऊरावांचे वडिल म्हणाले.

बायकोच्या देखत झालेला अपमान भाऊरांवाच्या जिव्हारी लागला. सौ. वहिनीचे (सौ.लक्ष्मीबाई) डोळेही भरून आले. त्या भाऊरावांना वाढत होत्या. त्यांच्या डोळ्यातले थेंब भाऊरावांच्या ताटात पडले. कर्मवीर जेवत्या ताटावरून उठले. मनाचा निश्चय केला . काहीतरी करून दाखवलेच पाहिजे असा मनाचा निर्धार करून तडक कोरेगाव ते सातारा अंतर पायी चालत आले. खिशात पैसा नाही. पूर्वी मुंबईच्या माणिकचंद पानाचंद या जवाहि-याकडे मिळालेले काम आपण सोडून आलो हा मूर्खपणा केला असे त्यांना वाटु लागले.त्यावेळी त्यांना एक कल्पना सुचली. शिकवण्या घेण्याची. त्यांनी संकल्प सोडला.भाऊरावांच्या अंगी एक गुण होता.एखादी गोष्ट मनावर घेतली की त्या गोष्टीचा पिच्छा पुरवायचा. मग कितीही कष्ट पडोत. शिकवणी वर्ग सुरू केले. हळूहळू मुले वाढू लागली, बोलता बोलता मासिक उत्पन्न ९०-९५ रूपयांपर्यंत गेले. भाऊरावांनी सौ. ल क्ष्मीबाईना साता-यात आणले. ती अण्णा पाटील म्हणून ओळखले जाऊ लागले.

या काळात ती अण्णांकडे संस्कृतची शिकवणी आली. भाऊरावांना संस्कृत येत नव्हते तरी त्यांनी ती शिकवणी घेतली. भाऊराव भल्या पहाटे चार वाजता पंडित गजेंद्रगडकर यांच्याकडे संस्कृत शिकण्यासाठी जात मुलाला संस्कृत शिकवीन. पुढे तो मुलगा चांगल्या गुणांनी पास झाला. ती अण्णांकडे जिद्द व चिकाटी असल्यामुळे हे शक्य झाले. त्याकाळी मुलांना शिक्षणासाठी दूरगावी जावे लागे. मुलांची रहण्याची सोय व्हावी म्हणून कर्मवीर अण्णा, मदृवाण्णा मास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर इ. मंडळीनी १९१० साली ‘ दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ ’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे वसतीगृह पेठ नेर्ले या गावी सुरू करण्यात आले. दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ हेच रयत शिक्षण संस्थेचे मूळ रोपटे होय.

१४ फेब्रुवारी, १९१४ च्या रात्री कोल्हापुरात सातवा एडवर्ड व व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासले गेले.वसतीगृहातील मुलांना फूस लावून, कर्मवीरांची वसतीगृहातून हकालपट्टी करणारे, वसतीगृह प्रमुख लठ्ठे यांनी हे कृत्य केले असा बनाव करण्यात आला. कर्मवीरांनी विरूध्द साक्ष द्यावी म्हणून त्यांचा छळ करण्यात आला. कर्मवीरांनी खोटी साक्ष देण्याचे नाकारले. ‘ एक वेळ मरण पत्करेन, पण खोटी साक्ष देणार नाही. ’ असे कर्मवीरांनी सांगितले. शेवटी त्यांची निर्दोष सुटका झाली व ते विट्याला गेले.

त्यानंतर कर्मवीरांनी ओगले ग्लास वर्क्समध्ये काम सुरू केले. पुढे लक्ष्मणराव किर्लोसकरांनी नांगराचा कारखाना काढला. त्या कारखान्यात ने प्रचारक म्हणून काम करू लागले. यामुळे फिरती सुरू झाली. कर्मवीरांनी महाराष्ट्र पायाखाली घातला. लोकांचे दारिद्र्य डोळ्यांनी पाहिले. अज्ञान हे दारिद्र्याचे मूळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोकांना सज्ञान केले पाहिजे याची जाणीव झाली. दरम्यानच्या काळात कर्मवीरांनी कूपर कारखान्यात नोकरी सुरू केली. कामावर रूजू होताना कूपरने निव्वळ नफ्याच्या १० टक्के भाग कर्मवीरांच्या बोर्डिंग विकासासाठी देण्याचे वचन दिले होते. ते कूपरने न पाळल्यामुळे कूपरशी भांडण करून त्यांनी ती नोकरी सोडली व पूर्णवेळ शैक्षणिक कार्याला वाहून घेतले.

कर्मवीरांचे, महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या, सत्यशोधक चळवळीचे काम चालूच होते. ४ ऑक्टोंबर, १९१९ रोजी (विजयादशमी) काले, जि. सातारा येथे सत्यशोधक समाजाची मोठी परिषद भरली होती. या परिषदेत कर्मवीरांनी ‘ रयत शिक्षण संस्था ’ स्थापण्याची घोषणा केली. त्यासाठी वसतिगृ सुरू झाले. त्यावेळी कर्मवीरांनी संस्थेचे खालील उद्देश ठरविले आहेत.

१. मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड उत्पन्न करणे.

२. मागसलेल्या जातीतील अत्यंत गरीब मुलांना शक्यतो मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे.

३. सामान्य स्थितीतील मुलांना त्यांच्या खर्चाचे किंवा फार तर निम्म्या खर्चाने शिक्षणासाठी ठेवून घेणे.

४. ज्यांची सांपत्तिक स्थिती समाधानकारक आहे. अशा परगावच्या मागासलेल्या विद्यार्थ्याची त्याच्यांच

खर्चाने संस्थेत सोय करणे.

५. मागासलेल्या वर्गातील निरनिराळ्या जातीतील विद्यार्थ्यांमध्ये प्रेमभाव उत्पन्न करणे.

६. पूर्वकालीन अंधरूढीस फाटा देऊन ख-या मार्गाचा अवलंब करण्याचे वळण देणे.

७. मिळून – मिसळून वागण्यापासून संघशक्ती निर्माण होते. तिचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीने पटविणे.

८. मुले काटकसरी नियमित, स्वावलंबी, उद्योगी, उत्साही व शीलवान बनविण्याचा प्रयत्न करणे.

९. संस्थेचे शिक्षणाच्या बाबतीत कार्यक्षेत्र वाढविणे.

वसतीगृह सुरू करण्यामागे कर्मवीरांची भूमिका

ग्रामीण जनता अडाणी असल्यामुळे कर्जबाजारीपणा, अंधश्रध्दा, जुन्या चालीरिती यात अडकली होती. शिक्षणाबद्दल उदासीन होती. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक होते. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न होता. शिक्षणासाठी परगावी ठेवणे व त्यासाठी खर्च करणे अशक्य होते. ग्रामीण जनतेच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर अगोदर त्यांच्या राहण्या – जेवणाची सोय केली पाहिजे. हे लक्षात घेऊन कर्मवीरांनी वसतीगृहापासून कार्याची सुरूवात केली. त्यांनी पालकाना मदत केल्यामुळे त्यांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली.कर्मवीर अण्णानी सोमवार पेठेत आपल्या राहत्या घरी १९२४ मध्ये वसतीगृह सुरू केले. या वसतीगृहात विविध जातींची व धर्मांची मुले दाखल करून घेतली. हे करताना त्यांच्यापुढे महात्मा फुले व शाहू महाराजांचा आदर्श होता. १९२७ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शुभहस्ते या वसतीगृहाचे ‘ छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस ’ असे नामकरण झाले. कर्मवीर अण्णांच्या कार्याने महात्मा गांधी अत्यंत प्रभावित झाले.त्यांनी कर्मवीरांना शुभाशीर्वाद दिला.

अनेक जातींची व धर्माची मुले एकाच ठिकाणी राहतात. स्वतः जेवण तयार करतात. एकत्र बसून जेवण घेतात. हे एकून ते कर्मवीरांना म्हणाले,

“ मी साबरमती आश्रमात हा प्रयोग करून पाहिला. पण तेथे मला यश आले नाही भाऊराव, तुम्ही प्रयोग यशस्वी करून दाखविला. याबद्दल तुम्हाला धन्यवाद……. तुम्ही येथे नवसमाजाची उभारणी करीत आहात तुमच्या कार्यास माझा शुभ आशीर्वाद आहे. ”

कर्मवीरांनी वसतीगृह सुरू केल्यानंतर हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. त्यामुळे शाहू बोर्डिंग खंडाने घेतलेल्या धनिणीच्या बागेत स्थलांतरित करण्यात आले. ( राज घराण्यातील स्त्रिया तेथे फिरावयास जात असत म्हणून त्या बागेला ‘ धनिणीची बाग ’ असे नाव रूढ झाले.)

वसतीगृहाचा खर्च वाढू लागला. तोंड मिळवणी करण्याकरिता कर्मवीर धान्यरूपाने मदत गोळा करू लागले.गृहणी जात्यावर दळण दळण्यापूर्वी एक मूठ धान्य कर्मवीरांच्या वसतीगृहासाठी बाजूला काढून ठेवू लागल्या. ही ती कर्मवीरांनी सुरू केलेली ‘ मुष्ठी फड ’ योजना . आठवड्यापासून या योजनेतील धान्य गोळा होऊ लागले. विद्यार्थी व शिक्षक खळ्यावर जाऊन धान्य गोळा करीत. जमिनीचा सारा वसूल करताना देणगी मिळे. विहिरीला पाणी लागले, मुलगा झाला, वास्तुशांत,लग्नसंमारभात उपस्थित राहून देणगी मिळवू लागले. यामुळे कर्मवीरांचे नाव घरोघरी झाले. त्यांच्या कार्याबद्दल लोकांमध्ये आपलेपणा व जागृती निर्माण झाली.

अशाप्रकारे मदत गोळा केली तर अनेक वेळा अडचणी निर्माण होत. अशावेळी कर्मवीर अण्णा सौ. वहिणीकडून एखादा दागिना मागून घेत . तो विकून टाकीत व वसतीगृहाची अडचण दूर करीत. बोलता बोलता सौ.वहिणीचे १२० तोळे सोने वसतीगृहासाठी व ती अण्णांच्या शैक्षणिक कार्यासाठी वापरले गेले. एका प्रसंगी तर सौ. वहिनीचा शौभाग्यालंकार (मंगळसूत्र) विकावा लागला. सौ. वहिणी या असीम त्यागाचे प्रतीक ठरल्या. त्या रयतेच्या माऊली झाल्या.

कर्मवीर अण्णा व सौ. वहिनी यांनी मुलांवर पुत्रवत प्रेम केले. सुरूवातीच्या काळात सौ. वहिनी सोवळे – ओवळे पाळीत. कालांतराने त्यांच्यात बदल झाला. शाळेच्या मधल्या सुट्टीत मुले घरी येत व रेंगाळू लागत. आईपासून दूर असणा-या या लेकरांना पाहून त्यांचे मातृहृदय जागे होई. त्या मूलांना गूळ शेंगा देत व ‘ कुणाला सांगू नको ’ असे म्हणत. त्यामुळे प्रत्येक मुलाला वहिनी आपल्यावरच प्रेम करतात असे वाटे.

वसतीगृहातल्या मुलांवर भाउरावांची मायेची पाखर असे. भाऊराव वसतीगृहात राहत असत. मुलांचे जेवण व्यवस्थित होते की नाही, मुले अभ्यास करतात की नाहीत, पहाटे उठतात की नाहीत हे जातीने पाहत असत. कर्मवीर मध्य रात्री उठत. हातामध्ये कंदील घेऊन झोपलेल्या मुलांमधून हिंडत. त्यांच्या अंगावरील पांघरून बाजूला पडलेले आहे त्यांच्या अंगावर पांघरून घालीत. काही मुले अंथरूणाखाली जात. त्यांना अंथरूणावर घेत. दिवा तसाच ठेवून अभ्यास करता करता झोपी गेलेल्या मुलांच्या उशाचा दिवा विझवून बाजूला ठेवीत. एके दिवशी एक मुलगा असाच उघडा पडला होता. त्याची उलमाल झालेली कर्मवीरांनी पाहिली. त्याच्या अंगात ताप भरलेला होता. कर्मवीरांनी त्याला आपल्या अंथरूणात घेतले. त्याला पांघरून घातले. वसतीगृहातील काही मुलांना आई नव्हती. काहींना वडील नव्हते. सौ. वहिनी व ती अण्णांनी त्यांना आईवडीलांची उणीव कधीच भासू दिली नाही.

कर्मवीरांनी मुलांना ‘ कमवा व शिका ’ , ‘ श्रम करा व शिका ’ हा मंत्र दिला . त्यांनी श्रमाच्या प्रतिष्ठेची दीक्षा सर्वांना दिली.

वसतीगृहातील मुलांबद्दल कर्मवीरांनी खालील तत्त्वे अमलात आणली होती.

१. विद्यार्थी ज्ञानाची अभिलाषा धरणारा असला पाहिजे.

२. त्याला स्वालंबनाची आवड असली पाहिजे.

३. त्यांच्या मनात बंधुभाव असला पाहिजे.

४. विद्यार्थ्याने जात, गोत, धर्म, पंथ असा भेदभाव मानता कामा नये.

५. तसेच गरीब – श्रीमंत भेद मानता कामा नये.

६. त्याने राहणी चांगली ठेवली पाहिजे.

७. त्याने अस्पृश्यता मानता कामा नये.

८. तो सदगुणी, चरित्र्यसंपन्न असला पाहिजे.

९. तो रूढीप्रिय असू नये.

१०. त्याचे वर्तन स्वाभिमानाचे असावे.

या तत्त्वांतून असे दिसून येते की, कर्मवीरांचा नवा मानव घडविण्याचा प्रयत्न होता.

अ) प्राथमिक शाळा

किर्लोस्करमधील नोकरीच्या निमित्ताने कर्मवीरांनी दुर्गम, दुष्काळी डोंगराळ भाग पायी तुडविला होता. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षणाविषयीची तळमळ व प्रयत्न त्यांनी अभ्यासले होते. मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय जोपर्यंत होत नाही व ते त्यांना मिळत नाही तोपर्यंत त्यांचे उच्च शिक्षण करणे व होणे अवघड आहे हे त्यांनी जाणले होते. म्हणून त्यांनी प्राथमिक शाळा काढण्याकडे प्रथम लक्ष केंद्रित केले. त्या काळच्या समाजात अंधश्रध्दा होत्या. समाज रूढीप्रिय होता. त्यामुळे कर्मवीरांना या अडाणी समाजाची समजूत काढावी लागे. शाळा काढल्यास देवाचा कोप होईल, शिक्षण घेतल्यास पाप लागेल असे लोक म्हणत, काही ठिकानी देवाला कौल लावून शाळा काढण्यात आल्या. कर्मवीरांनी शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले, शाळा काढली. तेथे ध्येयवादी शिक्षकांची नेमणूक केली. हे शिक्षक गावक-यांना धरून राहत. त्यांना सर्व प्रकारची मदत करीत. गावचा मार्गदर्शक म्हणून शिक्षक काम करीत. जेथे कोणीही शाळा काढणार नाही तेथे कर्मवीर स्वतःजात महाबळेश्वर पायथ्याशी खरोशी नावाचे गाव आहे. हे ठिकाण अतिशय दुर्गम आहे. त्या ठिकाणी स्वतःजाऊन कर्मवीरांनी शाळा काढली. अशा प्रकारे दुर्गम दुष्काळी डोंगराळ भागात अडाणी लोकांच्या घरात कर्मवीरांनी ज्ञानाचा दिवा पोहचवला व त्यांचे जीवन उजळून टाकले. कर्मवीरांनी अशा ५७८ शाळा चालविल्या होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात कर्मवीरांनी त्या शाळा महाराष्ट्र सरकारकडे सुपुर्त केल्या.

प्राथमिक शिक्षण चांगल्या प्रतीचे व्हायचे असेल तर त्या शाळेत प्रशिक्षित शिक्षक असला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणारे केंद्र असले पाहिजे हे लक्षात घेऊन कर्मवीरांनी १९३५ साली ‘ सिल्व्हर ज्युविली रूरल ट्रेनिंग कॉलेज ’, सातारा येथे सुरू केले व प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सोय केली. नंतर या कॉलेजचे ‘ महात्मा फुले अध्यापक विद्यालय ’ असे नामकरण करण्यात आले. १९४२ मध्ये मुलींच्या प्रशिक्षणासाठी ‘ जिजामाता अध्यापिका विद्यालय ’ या स्वतंत्र प्राथमिक शिक्षिका प्रशिक्षण केंद्राची कर्मवीरांनी स्थापना केली.

ब) माध्यमिक शाळा

मुलांना श्रमाची प्रतिष्ठा समजली पाहिजे. स्वावलंबनातून शिक्षण मिळवले पाहिजे. मुले शिक्षणासाठी आई – वडिलांवर अवलंबून राहता कामा नयेत असा अभिनव प्रयोग कर्मवीरांनी शिक्षणक्षेत्रात सुरू केला. त्यानुसार त्यांनी वसतीगृहे चालविली. वसतीगॄहातील मुले स्वयंपाक करणे, शेती करणे, भाजीपाला पिकवणे, त्याची विक्री करणे इ. सर्व कामे करीत होती. त्यातून त्यांचा निवासाचा व भोजनाचा खर्च केला जाई. अर्थात स्वतःच्या माध्यमिक शाळा नसल्यामुळे कर्मवीरांनी माध्यमिक शाळा सुरू करण्याचा संकल्प केला. त्यानुसार १९४० मध्ये कर्मवीरांनी ‘ महाराज सयाजीराव गायकवाड फ्री अँड रेसिडेंसियल स्कूलची ’ स्थापना केली. या विद्यालयात सुरूवातीच्या काळात ‘ कमवा व शिका ’ या तत्त्वप्रणालीतून शिकणा-या मुलानांच प्रवेश दिला जाई. कालांतराने इतर मुलानांही प्रवेश दिला जाऊ लागला. शाळेचे नाव ही ‘ महाराजा सयाजीराव विद्यालय’ करण्यात आले. त्यानंतर लोणंद, शिरवळ येथे माध्यमिक विद्यालये सुरू झाली. १९५३- ५४ मध्ये संस्थेची ४४ विद्यालये होती. आज मितीला संस्थेची ४३८ माध्यमिक विद्यालये कार्यरत आहेत.

क) महाविद्यालये

संस्थेच्या शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण करणा-या गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कोल्हापूर, पुणे, सांगली, मुंबई, बेळगाव, बडोदा इत्यादी ठिकाणी पाठवावे लागे. त्यांचा खर्च संस्थेमार्फत कारावा लागे. त्यांचा मोठा ताण कर्मवीरांना सहन करावा लागे. त्यामुळे त्यांनी कॉलेज (महाविद्यालय) स्थापन करण्याचा निश्चय केला. तसेच ‘ कमवा व शिका ’ हा स्वावलंबनाचा प्रयोगही उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यावर कर्मवीरांना करावयाचा होता. त्यानुसार १९४७ मध्ये कर्मवीरांनी सातारा येथे महाविद्यालयाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे कर्मवीरांचे स्फूर्तिस्थान. त्यांचेच नाव महाविद्यालयाला देण्याचे निश्चित झाले. महाविद्यालयाचे नाव ‘ छत्रपती शिवाजी फ्री अँड रेसिडेंसियल कॉलेज ’ असे ठेवण्यात आले. सुरूवातीला महाविद्यालयात कला व वाणिज्य विभाग होता. कालांतराने शास्त्र विभाग सुरू करण्यात आला.

१९५४ मध्ये शिक्षणक्षेत्रात कर्मवीरांनी एक आश्चर्यकारक इतिहास घडविला.सैदापूर ता. कराड या ग्रामपंचायतीच्या गावात कर्मवीरांनी महाविद्यालय सुरू केले. पुण्याच्या मंडईतील मंडळींनी महाविद्यालय सुरू करण्यास आर्थिक मदत दिली. ‘ सदगुरू गाडगे महाराज कॉलेज ’ या नावाने हे कॉलेज सुरू झाले. महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात एक आगळा वेगळा प्र्योग म्हणून या कार्याची नोंद घ्यावी लागेल संस्थेची बहुतेक महाविद्यालये तालुक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय झाली आहे.

माध्यमिक शाळेतील शिक्षणाच्या दर्जा उंचावण्यासाठी माध्यमिक शाळेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक असावेत व ते शिक्षक संस्थेच्या ध्येय धोरणानुसार काम करणारे असावेत या हेतूने कर्मवीरांनी १९५५ साली सातारा येथे ‘ आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन ’ ची स्थापना केली या महाविद्यालयातून दर्जेदार शिक्षक तयार झाले. त्यांनी संस्थेत व संस्थेबाहेरील शाळेत उत्तम प्रकारे काम केले आजही करताहेत आज संस्थेची ४१महाविद्यालये असून त्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज व दोन अध्यापक महाविद्यालयांचा समावेश आहे .

संस्थेच्या इतिहासातील काही उल्लेखनीय घटना

१. माहुलीच्या विठ्ठलराव देशमुखांनी आपल्या भावाच्या लग्नात आलेला सर्व हुंडा कर्मवीरांना अर्पण केला. विठ्ठलराव देशमुख लग्नाला आलेल्या मंडळींना उद्देशून म्हणाले, ‘ बंधुभगिनीनो, गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहचविणारा भगीरथ माझ्या बंधूंच्या लगनाला आशीर्वाद द्यायला आलेला आहे. त्यांच्या शिक्षणकार्यकरिता बंधूच्या हुंड्याची सर्व रक्कम त्यांना मी अर्पण करीत आहे.”

२. छत्रपती शिवाजी कॉलेज काढण्याचा कर्मवीरांनी संकल्प केला. त्यासाठी २५००० /- रूपये विद्यापीठाकडे अनामत रक्कम भरणे आवश्यक होते. देणगी गोळा करण्यासाठी कर्मवीर मुंबईत वणवण फिरू लागले. पैसे जमेनात यावेळी कर्मवीरांचे एक चाहते धोंडाजी पाटील कर्मवीरांना भेटले.धोंडजी पाटलांनी खोको व्यापारात कष्ट्पूर्वक पैसा मिळविला होता. कर्मवीरांनी त्यांना न मागता धोंडजी पाटलांनी त्यांना रू. २५००० /- दिले. त्यामुळे कॉलेज काढण्याचा मार्ग सुकर झाला.

३. कराडला काढलेल्या ‘ सदगुरू गाडगे महाराज कॉलेज ’ ची अनामत रक्कम भरण्यासाठी पुण्याच्या मंडईतील लोकांनी रू. २५००० /- जमा करून दिले.

४. वसतीगृहातील एक मुलगा आजारी पडला होता. कर्मवीर बाहेरगावी होते. सौ. वहिनी त्या मुलाची देखभाल करीत होत्या. अशा वेळी सौ.वहिनीच्या घरून तार आली, “ आइ फार आजारी आहे ; लवकर निघून यावे,” सौ. वहिनींनी उलट तार केली. “ वसतीगृहातील माझा मुलगा फार आजारी आहे. भाऊराव बाहेरगावी गेले आहेत. ते आले की मी येईन.” कर्मवीर आल्यानंतर सौ. वहिनी आईस भेटावयास गेल्या.

५. आजीव सदस्य म्हणून संस्थेस वाहून घेण्याची शपथ घेण्याचा सोहळा महर्षी विठ्ठल रावजी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी महर्षी म्हणाले, “ देवांनी पुष्पवृष्टी करावी असा हा सोहळा आहे. ‘ याची देही याची डोळा ’ हे जे भाऊरावांना लाभले ते मला लाभले नाही. समाजसेवा अक्रोडाच्या झाडासारखी असते. झाड लावणा-यास फळ खावयास मिळत नाही. भाऊरावांनी लावलेल्या रोपट्याचा महान वृक्ष झाला. व त्याची फळेही त्यांना चाखता आली. ”

६. राष्ट्रपिता महात्मा गांधी ९.१.१९४८ रोजी विद्यार्थ्यानी जमविलेली एक लाख रूपये निधी कर्मवीरांनी अर्पण करण्याच्या सोहळ्यास पाठविलेला संदेश – “ श्री भाऊराव पाटील की सेवाही उनका किर्तीस्तंभ है । श्री भाऊराव पाटील दीर्घ काल तक सेवा करते रहे ।“

७. आप्पासाहेब यांना पाठविलेल्या पत्रातून कर्मवीर अण्णांची तत्त्वनिष्ठा आणि त्याग यांचे दर्शन घडते- आप्पासाहेबांना पाठविलेल्या पत्रात अण्णा म्हणतात “तु संस्थेमध्ये नोकरी करू नये अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती व आजही आहे . ज्या संस्थेच्या स्टोअर्समध्ये तु काम करीत आहेस त्या स्टोअर्सला चालू साली फारसा नफा झालेला नाही. व यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील त्यात तुला कमी न करता दुस-यास कमी करावे लागेल हे स्वभाविक आहे. अशावेळी तू होऊन नोकरी सोडावी व विमा कंपनीचा अगर इतर धंदा तु करावा अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे.”

८. आप्पासाहेबांना दरमहा दहा रूपये कोल्हापूर दरबाराची स्कॉलरशिप मिळत असे हे अण्णांना कळल्यानंतर ते तातडीने कोल्हापूरला आले व फ्क्त दोन रूपये आप्पासाहेबांना खर्चासाठी ठेवायला सांगितले. व आठ रूपये संस्थेमध्ये जमा करायला सांगितले. स्वतःच्या मुलाची स्कॉलरशिप संस्थेसाठी घेणारे अण्णांचे उदाहरण एकमेव असावे.

“ रयत शिक्षण संस्थेच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे ”

१९१९ – सत्यशोधक समाजाच्या परिषदेत काले, ता. कराड येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मांडलेला ‘रयत शिक्षण संस्था ’ स्थापनेचा ठराव झाला. (५.९.१९१९)

१९१९ - कर्मवीरांनी काले, ता. कराड येथे विजया दशमीच्या मुहर्तावर ‘रयत शिक्षण संस्था ’ स्थापन केली. (४.१०.१९१९) या वर्षी काले येथे वसतीगृह व रात्रशाळा सुरू केली.

१९२१ – नेर्ले ता. वाळवा येथे वसतीगॄह उघडले. मुष्टिफंड योजना सुरू केली. अंगापूर, ता. सातारा येथे प्राथमिक शिक्षकांच्या अधिवेशन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात कर्मवीरांनी भाषणात ट्रेनिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली.

१९२४ – रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथे स्थलांतर व सर्व जातिधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक महार विद्यार्थी घेऊन वसतीगृह काढले.

१९२७ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शुभहस्ते सातारा येथील वसतीगृहाचे “ श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस ” असे नामकरण करण्यात आले( २५.२.१९२७) साता-याच्या राजघराण्याकडून ११एकर ३८ गुंठे क्षेत्रफळाची ‘ धनिणीची बाग ’ वार्षिक ५७५ रू. खंडाने घेतली. ( १७ मे, १९२७)

१९३० – सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील ऊर्फ वहिनी यांचे निधन झाले. (३०.३.१९३०) (शाहू महाराजांची ‘काकडेबाग’ दरसाल ५० रू. खंडाने वसतीगृहासाठी घेतली.)

१९३२ – पुणे येथे “ युनियन बोर्डिंग हाऊस ” उघडून संस्थेच्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय केली. (सुप्रसिध्द “ गांधी – आंबेडकर ”कराराच्या स्मरणार्थ)

१९३३ – हरिजन सेवक संघाकडून संस्थेस द.म.रू. ५०० मदत सुरू झाली.

१९३४ – महाराष्ट्र सरकारनी संस्थेस द.म.रू. ५०० मदत सुरू झाली.

१९३५ – संस्थेची घटना मंजूर केली. (२१.४.१९३५) रयत शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रेशन केले ( ६.५.१९३५) जनरल बॉडीची पहिली बैठक हमीद ए. अली यांच्या अध्यक्षतेखाली धनिणीच्या बागेत झाली. “ दि सिल्व्हर जुबली रूरल ट्रेनिंग कॉलेज सातारा येथे सुरू केले. (१६.७.१९३५)

१९३६ – सातारा येथे “ रावबहादूर काळे प्रॅक्टिसिंग स्कूल ” सुरू केले (८.७.१९३६) डबेवाडी (सातारा), अंबोली (नाशिक) येथे प्राथमिक शाळा सुरू केल्या .

१९३७ – पदवीधर माजी विद्यार्थ्यांचा महर्षी वि.रा. शिंदे यांच्या उपस्थितीत संस्थेसाठी आजन्म वाहून घेण्याचा शपथविधी पार पडला. (२४.१०.१९३७)

१९३८ – “प्राथमिक शिक्षण समिती” ची स्थापना केली. (३.१०.१९३८) व खेडोपाडी व्हॉलंटरी शाळा उघडण्यास सुरूवात केली. यवतेश्वर (सातारा) येथे ‘पहिली व्हॉलंटरी शाळा’.

१९३९ – महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ महाराजा सयाजीरावांचे नातू महाराजा प्रतापसिंह यांच्या शुभहस्ते पार पडला. (३.१२.१९३९). त्याचवेळी पू. गाडगेबाबांचे कीर्तन झाले.

१९४० – “महाराजा सयाजीराव विद्यालय ”ही पहिली मोफत व निवासी माध्यमिक शाळा सुरू केली (२०.६.१९४०) संस्थासेवकांसाठी “ रयत सेवक को- ऑपरेटिव्ह सोसायटी ” स्थापन केली. १९६७ मध्ये तिचे बँकेत परिवर्तन झाले. “ कै. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिक्षण फंड ” निर्माण केला. वटवृक्षाच्या चित्रास संस्थेचे बोधचिन्ह म्हणून मान्यता.

१९४२ – संस्था सेवक व शाखा यांच्यासाठी “ रयत सेवा को-ऑप. स्टोअर्स ” सुरू केले. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी “ जिजामाता अध्यापिका विद्यालय ” व विद्यार्थीनींच्या सोईसाठी “ लक्ष्मीबाई पाटील वसतीगृह ” सुरू केले.

१९४४ – ग्रामीण भागात माध्यमिक विद्यालय उघडण्यास सुरूवात केली. उदा. लोणंद, अष्टे.

१९४७ – “ छत्रपती शिवाजी कॉलेज ” हे संस्थेचे पहिले मोफत व निवासी कॉलेज सातारा येथे सुरू केले.

१९४८ – महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ संस्थेमार्फत १०१ माध्यमिक विद्यालये व “ ग्रामीण विद्यापीठ ” सुरू करण्याची कर्मवीरांनी घोषणा केली. राज्य सरकारने संस्थेची ग्रॅट थांबवली व जनतेच्या दबावामुळे ३०.१.१९४९ मध्ये पुन्हा सुरू केली. रयत शिक्षण संस्थेचे “ आजीव सभासद मंडळ ” स्थापन करून मंडळाकडे संस्थेचा दैंनदिन कारभार सोपविला.

१९४९ – अहमदनगर जिल्ह्यात शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला. कर्जत (अहमदनगर) येथे माध्यमिक विद्यालय सुरू केले.

१९५० – “ रयत सेवक ” मासिक सुरू केले. (सध्या ते वार्षिक स्वरूपात प्रसिध्द होते.)

१९५१ – प्रवरा सहकारी साखर कारखान्याकडून सभादांच्या प्रत्येक ट्न उसामागे ४ आणे (२५ पैसे) फंड दरसाल मिळू लागला.

१९५३ – रयत शिक्षण संस्था व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या सहकार्याने माण तालुक्यात ग्रामविकासाचे कार्य सुरू झाले. शासनाकडून दहिवडी येथील मेंढ्यांचे पैदास केंद्र संस्थेस मिळाले.

१९५४ – सैदापूर ता.कराड येथे महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केली.

१९५५ – पदवीधर शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सातारा येथे प्रशिक्षण महाविद्यालय सुरू केले. यथावकाश त्याचे “ आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन ” असे नामकरण झाले.

१९५७ – “लक्ष्मीबाई ” भाऊराव पाटील शिक्षणोत्तेजक पतपेढीची ” स्थापना व त्यातून गरजू विद्यार्थ्यांना कर्जाची सोय केली.

१९५९ – संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे महानिर्वाण झाले. (९ मे, १९५९)

१९६० – घटनेत दुरूस्ती होऊन अध्यक्ष, चेअरमेन, ही पदे स्वतंत्र केली.संघटक हे पद निर्माण केले. नव्यानेच एक्झिक्युटिव्ह कमिटीची तरतुद केली. “ रयत शिक्षण संस्था सेवक वेल्फेअर फंडाची ” स्थापना केली. सातारा, जयसिंगपूर, अहमदनगर येथे मुलींसाठी माध्यमिक विद्यालये सुरू केली.

१९६२ – “ पंचायत राज्य प्रशिक्षण केंद्र ” सातारा येथे सुरू केले. (१ मे, १९६२).

१९६५ - “ रयत शिक्षण पत्रिका ” सुरू केली. ८२-८३ पासून त्रैमासिक व ९६-९७ पासून “ हाऊस मॅगेझिन ” मध्ये परिवर्तित झाली.

१९६८ – लॉ कॉलेज सुरू केले. यथावकाश याचे “ इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज ” असे नामकरण झाले.

१९७३ – पूर्णवेळ सचिवपद निर्माण झाले.

१९७४ – रयत शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे चार भिंतीवरील नव्या वास्तूत स्थलांतर झाले. “ कर्मवीर विद्याप्रबोधिनी ” स्थापना झाली.

१९७५ – रयत शिक्षण संस्था मध्यवर्ती कार्यालयाच्या नव्या वास्तूचे भारताचे परराष्ट्रमंत्री ना. यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते उदघाटन झाले. (१५.२.१९७५)

१९७८ – १. समाधी परिसरात, कर्मवीरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा, मुख्यमंत्री ना.वसंतदादा पाटील यांच्या शुभहस्ते अनावरण झाले. (९.मे, १९७८)

२. मॉडर्न प्री प्रायमरी, प्रायमरी व सेकंडरी इंग्लिश मीडीयम स्कूल वाशी येथे सुरू केले.

१९७९ - मॉडर्न कॉलेज (इंग्रजी माध्यम) वाशी, नवी मुंबई येथे सुरू केले.

१९८० – “ लाईफ वर्क्स ”योजना कार्यान्वित झाली.

१९८२ – रयत शिक्षण संस्थेच्या हरिक महोत्सवाचा सांगता समारंभ मा. राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली १४.६.८२ रोजी साजरा झाला. रयत प्रिटिंग प्रेस स्थापन झाला.

१९८३ – अभियांत्रिकी महाविद्यलय व तंत्रनिकेतन सुरू झाले. यथावकाश त्याचे ‘ कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन ’ असे नामकरण झाले.

१९८४ – ‘ रयत शिक्षण संस्था सेवक कुटुंब कल्याण योजनेचा ’ शुभारंभ (१.२.१९८४).

१९८७ – कर्मवीर जन्मशताब्दी शुभारंभ कोपरगाव येथे लोकसभेचे सभापती मा. बलराम जाखर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. (१८.१२.१९८७) २२ सप्टेंबर हा दिवस राज्यभर सर्व शैक्षणिक संस्थातून ‘ श्रमप्रतिष्ठा दिन ’ म्हणून दरवर्षी पाळण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले. कर्मवीर जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ’ दरवर्षी संस्थेमार्फत आयोजित करण्यास सुरूवात झाली.

१९८९ – “ महिला महाविद्यालये ” सातारा, सोलापूर, उंब्रज व अहमदनगर येथे सुरू केली. राज्यपाल मा. के. ब्रम्हानंद रेड्डी यांच्या उपस्थितीत कर्मवीर जन्मशताब्दी सांगता समारंभ पार पडला. (२२.९.१९८९)

१९९१ – “ अदिवासी आश्रमशाळा ” आडोशी ता. मोखाडा येथे सुरू केली.

१९९३ – रयत शिक्षण संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण (४.१०.१९९३)

१९९४ - रयत शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवाचा मा.शरदराव पवार यांच्या शुभहस्ते शुभारंभ (१७.५.१९९४)

१९९५ – १. कर्मवीर समाधी परिसरात सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण. (सौ. सरोजिनी नारायण पाटील यांच्या शुभहस्ते ९.५.१९९५)

२. संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालयात निवासी गुरूकुल प्रकल्प तसेच नापासांची शाळा (प्रगती विद्यालय) हे अभिनव उपक्रम कार्यान्वित.

१९९६ – १. रयत शिक्षण संस्थेस भारत सरकारच्या ‘ सामाजिक सामंजस्य व दुर्बल घटकांचा विकास ’ यासाठी देण्यात येणारा १९९४ चा (पहिल्या वर्षाचा) ‘ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार ’ जाहीर (२४ मार्च, १९९६) भारताचे राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान. (१४.४.१९९६)

२. विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेची तयारी व्हावी यासाठी संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा, येथे “ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना ” (आज महाराष्ट्रातील अग्रगण्य स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणून लौकिक) सध्या संस्थेच्या अनेक महाविद्यालयामधून अशा प्रकारच्या मार्गदर्शन केंद्राची स्थापना.

१९९७ – कर्मवीर समाधी परिसरात ‘ कर्मवीर स्मृती भवनाचे उदघाटन मा. शरदराव पवार यांच्या शुभहस्ते झाले. ’ (९.५.१९९७)

१९९८ – राजर्षी शाहू मेमोरिअल ट्रस्ट यांचा संस्थेसाठीच “ राजर्षी शाहू पुरस्कार ” पहिल्याच वर्षी रयत शिक्षण संस्थेस मिळाला.

२००० – महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात जनसेवेचे प्रशासनीय कार्य करणा-या शिक्षण संस्थेसाठीचा “ आदर्श शिक्षण संस्था, पुरस्कार ”पहिल्याच वर्षी रयत शिक्षण संस्थेस मिळाला.

२००१ – श्री गाडगे महाराज मिशनचा “ श्री संत गाडगे महाराज सेवा पुरस्कार ” पहिल्याच वर्षी रयत शिक्षण संस्थेस मिळाला.

२००२ – कर्मवीर भाऊराव पाटील व सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शैक्षणिक संकुलाची कुंभोज येथे स्थापना व रयत जागृती प्रकल्प कार्यान्वित.

२००४ – राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती मंडळ (नॅक) यांच्याक्डून संस्थेच्या सर्व महाविद्यालयांचे मूल्यांकन करून घेणारी महाराष्ट्रातील एकमेव शिक्षण संस्था.

२००५ – १. संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे सी.ई.टी., एम.एच.टी. मार्गदर्शन केंद्र सुरू केले.

२. कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत ‘ रयत प्रज्ञा शोध ’ प्रकल्प (आर.टी.एस.) कार्यान्वित बी.सी.ए., बी.सी.एस. व्यवसाय व्यवस्थापन पदवी व पदव्युत्तर अभ्यास व संशोधन केंद्राची स्थापना केली.

२०१० – संस्थेच्या सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची व्यवस्था केली.

२०१० – पूर्नमूल्यांकनामध्ये एकूण सात महाविद्यालयांपैकी तीन महाविद्यालयांना ‘ अ’ श्रेणी (सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड, महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी – पुणे, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा) तर चार महाविद्यालयांनी ‘बी’ श्रेणी प्राप्त (बळवंत कॉलेज विटा, एस.एस.जी.एम.कॉलेज, कोपरगाव व महात्मा फुले महाविद्यालय, पनवेल, दादा पाटील महा. कर्जत).

२०१० – विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा यांना “ कॉलेज विथ पोटॅन्शियल फॉर एक्सलन्स ” हा बहुमान प्राप्त.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी परदेशात शिक्षणासाठी पाठविलेले विद्यार्थी

१९३८ – श्री. शं. ब. सुखटणकर – बी. ए. बी. टी. (एडिंबरो) डीप. एड.

१९३८ – श्री. डी. एम. शिंदे (जर्मनी) डिप्लोमा इन लेदर

१९४६ – श्री. पी. जी. पाटील – बी. ए. (लंडन) बार – ऍट – लॉ

१९५० – श्री. बी. ए. बागवान – एम. ए. एल. एल. बी. (लंडन) बार – ऍट – लॉ

१९५० – श्री. बी. के. पाटील - बी. ए. एल. एल. बी. (लंडन) इकॉनॉमिक्स

१९५३ – श्री. एस. बी. चव्हाण – बी. ए. (लंडन) बी. एस्सी. (इकॉनॉमिक्स)

१९५५ – श्री. ए. डी. अत्तार – एम. ए. बी. टी. (बर्मिगहॅम) एम. ए.

१९५७ – श्री. एस. के. उनउने – एम. ए. बी. टी. (लंडन) एम. ए.

शासन शिष्यवृत्ती व रयत शिक्षण संस्था यांच्यावतीने परदेशी शिक्षणासाठी पाठविलेले विद्यार्थी

१९४५ – श्री. एम. आर. बोबडे

१९४५ – श्री. बी. ए. आवळे

१९४५ – मेघा कांबळे

१९४९ – श्री. बाबासाहेब भोसले

कर्मवीरांना मिळालेला बहुमान व झालेले गौरव

१९२१ – नेर्ले ता. वाळवा येथे महाराष्ट्रातील पहिला गौरव.

१९२१ – सातारा जिल्हा एन. एम. मॉक्सी यांच्या हस्ते सत्यशोधक म्हणून गौरव.

१९२६ – प्रबोधनकर ठाकरे यांनी लिहिलेल्या करर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरित्रात “ आदर्श समाजसेवक” म्हणून गौरव.

१९३३ – ग्राम उद्योग परिषेत ‘ कर्मवीर ’ असा प्रथम उल्लेख.

१९३७ – प्रगती व जैनविषय मासिकात पहिल्यांदा ‘कर्मवीर’ असा लेखी उल्लेख.

१९३९ – संत गाडगे महाराज यांच्या समाज प्रबोधनपर कीर्तनात ‘ कर्मवीर ’ असा उल्लेख करून गौरव.

१९४१ – धुळे म्युनिसिपालटीतर्फे सत्कार व मानपत्र प्रदान.

१९४५ – कोल्हापूर व्यापारी मंडळीकडून रू. २५,००० ची थैली देऊन त्यांचा सत्कार.

१९४८ – सातारा जिल्हापरिषदेमार्फत राजाराम बापू पाटील यांच्याहस्ते गौरव व ग्रॅन्ट सुरू करण्याचा ठराव.

१९४८ – संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून शेवरलेट गाडी (मोटारकार) व १ लाख १ हजाराची थैली भेट.

१९४९ – नगर जिल्हा लोकल बोर्डातर्फे मानपत्र देऊन सत्कार.

१९४९ – अहमदनगर – विविध संस्थानी मानपत्र देऊन गौरव.

१९५० – लासलगाव ग्रामस्थाच्यावतीने मानपत्र देऊन गौरव.

१९५२ – कान्हुर पठार शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार .

१९५२ – किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्सच्या कामगारातर्फे रू. २५,००० ची थैली देऊन सत्कार.

१९५५ – रामानंदनगर येथे डी. पी. करमकर यांच्याहस्ते कामगारांच्या वतीने सत्कार.

१९५७ – कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराजा शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते व मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्कार व रू. ४,६०, ००० ची थैली.

१९५८ – उत्तर सातारा जिल्हा लोकल बोर्डातर्फे मानपत्र व सत्कार.

१९५९ – भारत सरकारकडून राष्ट्रपतीच्या हस्ते ‘ पद्मभूषण ’ किताब देऊन गौरव.

१९५९ – पुणे विद्यापीठाकडून डी. लिट. पदवी प्रदान.

१९५९ – अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामस्थांकडून १ लाख रूपयांचा निधी देऊन गौरव.

१९८७ – भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गौरवार्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन. (हस्ते – तात्कालिन पंतप्रधान राजीव गांधी)

एक महान युगाचा अंत

१९१९ साली रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने कर्मवीरांनी एक छोटेसे रोपटे लावले. त्याचे संगोपन केले. त्याचे कालांतराने महान वटवृक्षात रूपांतर झाले. हे करताना कर्मवीरांनी ऊन, वारा, पाऊस याची तमा बाळगली नाही आयुष्यात अनंत अडचणी आल्या. जीवघेणी संकटे आली. कर्मवीरांनी त्यावर सर्व शक्तीसह मात केली. वटवृक्ष कधीही कोसळू दिला नाही. अविरत कष्टांचा परिणाम कर्मवीरांच्या प्रकृतीवर झाला. रक्तदाब, हृदयविकारासारख्या व्याधी जडल्या. शेवटी शेवटी पुण्याच्या ससून रूग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले. ९ मे, १९५९. शिवजंयतीचा दिवस. छ्त्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज ही कर्मवीरांची स्फूर्तिस्थाने. कर्मवीरांना शिवजयंतीच्या दिवशी मृत्यू आला. ज्ञानाचा यज्ञ मांडणा-या एका महान ऋषीचा अंत झाला. रयतेचा तारणहार रयतेला पारखा झाला.

संस्थेची वाटचाल

कर्मवीर अण्णा कायम भविष्यकाळाचा विचार करीत असत. गावोगावी शाळा काढताना त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना या कार्यात सहभागी करून घेतले. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे कार्य सुरळीत चालू राहिले. कर्मवीरांच्या नंतर्संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेचे कार्य सुरळीतपणे चालविले आहे.

बहुजन समाजाचे शिक्षण करणे हे कर्मवीरांचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी कर्मवीर आयुष्यभर झगडले व यशस्वी झाले. आज ही संस्थेची त्याच ध्येय धोरणांनुसार वाटचाल चालू आहे. आज शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडत आहेत. संगणक, माहिती व तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, व्यावसायाभिमुख शिक्षण अशा अनेक संकल्पना येत आहेत. या संकल्पना व बदल ग्रामीण विभागापर्यंत पोहचविण्याचे काम संस्था करीत आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या ‘ कर्मवीर विद्याप्रबोधिनी ’ मार्फत अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचे चांगले परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर दिसून येतात.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यातील काही ठळक घटना

१९१४ – विक्री प्रतिनिधी म्हणून काम – ओगले ग्लास वर्क्स, ओगलेवाडी.

१९१६ – विक्री प्रतिनिधी म्हणून काम – किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी.

१९१९ – ४ ऑक्टोंबर, रयत शिक्षण संस्था वसतीगृहाची काले ता. कराड येथे स्थापना करून शैक्षणिक कार्याला सुरूवात

१९२१ – नेर्ले ता. वाळवा येथे वसतीगृह स्थापना.

१९२४ – रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय कालेहून साता-याला आणले. सर्व जातीसाठी खुले वसतीगृह सुरू केले.

१९३० – ३० मार्च, पत्नी सौ.ल्क्ष्मीबाई पाटील तथा ‘वहिनी’ यांचे निधन.

१९३२ – कॉलेज विद्यार्थ्यांसाठी पुण्यात ‘युनियन बोर्डिंग हाऊस’ ची स्थापना.

१९३५ – रयत शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रेशन केले.

१९३५ – प्राथमिक शिक्षकांसाठी ट्रेनिंग कॉलेजची स्थापना.

१९४० – ‘महाराजा सयायाजीराव हायस्कूल’ ची स्थापना.

१९४२ – पायगौंडा पाटील (वडिलांचे निधन).

१९४५ – कोल्हापूरच्या व्यापा-याकडून पंचवीस हजाराची देणगी.

१९४७ – ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ सातारा – स्थापना.

१९४८ – साता-यातील स्टुडंट्स काँग्रेसतर्फे एक लाख रू. निधी जमवून गाडगेमहाराजांतर्फे भाऊरावांना अर्पण.

१९५२ – किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी येथील कामगारांतर्फे पंचवीस हजार रू. देऊन सत्कार.

१९५४ – सदगुरू गाडगे महाराज कॉलेजची कराड येथे स्थापना.

१९५५ – आझाद कॉलेजची स्थापना.

१९५९ – २० जानेवारी, राष्ट्रपतीकडून ‘ पद्मभूषण ’ हा मान.

१९५९ – ४ एप्रिल, पुणे विद्यापीठातर्फे ‘ डी. लिट.’ पदवी प्रदान.

१९५९ – ६ मे, अहमदनगर जिल्ह्यातील गावक-यांकडून सत्कार एक लाख रू. देणगी प्रदान.

१९५९ – ९ मे, मृत्यू.

¨¨¨¨¨

३ टिप्पण्या: